शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उद्या (26 मे) राज्यसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. त्यांच्यासोबतच शिवसेनेकडून कोल्हापूरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार (Sanjay Pawar) हेदेखील निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. तत्पूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्वर ओक येथे जाऊन भेट घेतली. आपण राज्यसभे निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) उमेदवारी अर्ज उद्या दाखल करत आहोत. त्यासाठी वडीधारे असलेले नेते शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या वेळी आमची विविध विषांवर चर्चा झाली. तसेच, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय पक्का आहे. महाविकासआघडी दोन्ही उमेदवारांपाठीमागे भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे गुलाल नक्की आहे, अशी ग्वाहीही पवार यांनी दिल्याचे राऊत यांनी सांगितले.
महाविकासआघाडीकडे आवश्यकतेची पूर्तता करण्याएवढी मते आहेत. त्यामुळे सहावा उमेदवार शिवसेनेचाच निवडूण येईल असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार हे एक देशातील उत्तुंग नेते आहेत. महाविकाआघाडीचे ते आधारस्तंभ आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्वात ज्येष्ठ आणि वडीलधारे आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या भेटीच्या निमित्ताने आमची विविध विषयांवर चर्चाही झाली, असे संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Shiv Sena: शिवसेनेचे दोन संजय राज्यसभेवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्याच भरणार अर्ज; संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता)
संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर दावा सांगितला होता. मात्र शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला नाही. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे समर्थकांनी संजय राऊत यांना हे महागात पडेल असे म्हटले होते. याबाबत विचारले असता. इथे संजय राऊत यांचा वैयक्तीक काय संबंध? आणि शिवसेनेचा तरी काय संबंध? संभाजीराजे सहाव्या जागेसाठी इच्छुक होते. आम्ही त्यांना म्हणत होतो आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तुमची उमेदवारी तुम्ही शिवसेनेकडून जाहीर करा. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरा. इतकीच माफक आपेक्षा शिवसेनेची होती. छत्रपती घराण्याप्रति असलेल्या आदरापोठीच आम्ही हे बोलत होतो ना? तरीही त्यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.