राज्यसभेसाठी शिवसेना (Shiv Sena) आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवत आहे. राज्यसभेवर दोन संजयांना पाठविण्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हे दोन्ही संजय उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे दोन संजय म्हणजे पहिले आहेत संजय राऊत (Sanjay Raut) तर दुसरे आहेत संजय पवार(Sanjay Pawar) . शिवसेनेकडून पहिल्या जागेसाठी खासदार संजय राऊत यांना पुन्हा संधी दिली जाने अपेक्षीतच होते. उत्सुकता होती सहाव्या जागेसाठी. कारण या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्या अशी गळ शिवसेनेला घातली होती.
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला पाठिबा मागताच शिवसेनेने सावध पावले टाकली. आम्ही तुम्हाला पाठिंबाच नव्हे तर थेट उमेदवारी देतो. त्यासाठी आपण आपला उमेदवारी अर्ज शिवसेनेच्या तिकीटावर दाखल करा. त्यासाठी आगोदर शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधा, असे शिवसेनेने म्हटले. शिवसेनेचा प्रस्ताव संभाजीराजे यांनी अमान्य केला. सहाजिकच शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला. संभाजीराजे यांचा विषय आपल्यासाठी संपला आहे, असे म्हणत शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: 'महाराजांना राजकीय पक्षाचे वावडे नसावे' म्हणत संभाजीराजे छत्रपती यांचा विषय संपवला, शिवसेनेकडून संजय पवार यांना संधी)
संजय राऊत आणि संजय पवार हे दोन्ही उमेदवार उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजप सहव्या जागेसाठी उमेदवार देणार का? भाजपने उमेदवार दिलाच तर तो कोण असेल याबाबतही उत्सुकता आहे.
संजय पवार कोण आहेत?
संजय पवार हे कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत. पाठीमागील 30 वर्षे ते शिवसेनेत सक्रीय आहेत. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. 1989 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यापासून ते कट्टर शिवसैनिक आहेत. कोल्हापूर महापालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पाठीमागील 30 वर्षे ते शिवसेनेकडून विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. पण ऐनवेळी तिकीट त्यांना हुलकावणी देत होते. सर्वसामान्यांच्या बाजूने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. भाजप, काँग्रेस अशा अनेक पक्षांनी त्यांना अनेक वेळी विविध अमिष दाखवली. पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या. मात्र, असे असूनही त्यांनी शिवसेना आणि शिवसेनेचा भगवा सोडला नाही. त्यामुळे त्यांची पक्षनिष्टा आता कामाला येणार असे चित्र सध्यातरी दिसते आहे.