Rajmata Jijau Janmotsav: उद्या सिंदखेड राजा येथे मोठ्या थाटात साजरा होणार राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
A statue of Rajmata Jijabai (Photo Credits: Facebook/Arya Samaj)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ यांचा उद्या जन्मोत्सव (Rajmata Jijau Janmotsav). जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी इ.स. 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे झाला होता. उद्या संपूर्ण महाराष्ट्रात जिजाऊंचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. त्यात सिंदखेड राजा या ठिकाणी तर विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.

जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मोत्सवासाठी सिंदखेड राजा नगरी सज्ज झाली असून, जिजाऊ सृष्टीवर त्यानुषंगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी राज्यातून ठीक ठिकाणहून लोक सिंदखेड राजा येथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

यंदाचा हा 422 वा जन्मोत्सव सोहळा आहे व यावर्षीही लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. यासाठी जिजाऊ सृष्टीचे संपूर्ण रूप पालटण्यात आले आहे. भाविकांसाठी वाहनतळ, दुकाने, उपहारगृह, प्रकाश व्यवस्था यांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आज संध्याकाळी शहरातून मशाल यात्रा निघणार आहे. यामध्ये पारंपारिक वेशातील महिला हातात मशाल घेऊन सहभागी होतील. त्यानंतर उद्या दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. याची सुरुवात सकाळी सहा वाजता महापुजेने होईल. (हेही वाचा: Rajmata Jijabai Jayanti Wishes: राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी Messages, HD Images, WhatsApp Status शेअर करून वाहा जिजाऊंना आदराजंली)

त्यानंतर शिवकिर्तन, जिजाऊसृष्टीवर ध्वजवंदन पार पडेल. पुढे पुस्तक प्रकाशन, सामुहिक विवाह सोहळे व काही सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. दुपारी शिवधर्मपीठावरील मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, युवराज्ञी संयोगीता संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. या दिवसाचे औचित्य साधून छञपती संभाजी राजे भोसले यांना मराठा विश्वभुषण पुरस्कार, तर बबीता ताडे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  दरम्यान, हा सोहळा 11 ते 14 जानेवारी पर्यंत चालणार आहे, उद्या या सोहळ्याचा मुख्य दिवस असेल.