बाळा नांदगावकर वायरल व्हिडिओ । instagram.com/stories/akash.s_18/

'आवाज मराठीचा' च्या व्यासपीठावर ठाकरे  बंधू, ठाकरे कुटुंब आणि ठाकरेंची पुढची पिढी यांचं पुन्हा एकत्र येणं अनेक मराठी मनांना सुखावून गेलं. हा कार्यक्रम हिंदी सक्ती विरूद्ध मराठी लोकांचा होता पण व्यासपीठावर केवळ ठाकरे बंधू होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने त्यांची एन्ट्री  खास डिझाईन करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या पक्षातील मोजकीच मंडळी मागे व्यवस्था पाहत  होते. पण यात आघाडीवर असलेला जुना शिवसैनिक आणि राज ठाकरेंचा शिलेदार बाळा नांदगावकर आघाडीवर होते.  जुन्या मुलाखती मध्ये बाळा नांदगावकरांनी महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन बंधू एकत्र यावेत ही इच्छा आहे. यामागे कोणताही स्वार्थ नाही आणि त्यात माझं राजकारण संपलं तरी चालेल  असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. नक्की वाचा: Raj-Uddhav Thackeray Reunion: राज-उद्धव ठाकरे युती निवडणुकीसाठी म्हणणाऱ्यांना मनसे च्या संदीप देशपांडेंनी दिलं एका फोटोतून प्रत्युत्तर. 

बाळा नांदगावकरांच्या कृतीने हेलावली अनेकांची मनं

व्यासपीठावर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. यावेळी मागे असलेले बाळा नांदगावकर हात जोडून भावूक झालेल्या अवस्थेमध्ये उभे होते. सध्या त्यांच्या या कृतीचा फोटो, व्हीडिओ वायरल होत आहे.

काय म्हणाले होते बाळा नांदगावकर

बाळासाहेब ठाकरे  आजारपणामध्ये लीलावती हॉस्पिटलला दाखल असताना  बाळा नांदगावकर त्यांच्या भेटीला गेले होते. यावेळी ते दोघेच असताना बाळा नांदगावकरांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा मिलनाचं वचन आपण बाळ  ठाकरेंना दिलं असल्याचं एबीपी च्या ' माझा कट्टा' वर असताना ते म्हणाले होते. बाळा नांदगावकरांचे हे प्रयत्न अखेर 20 वर्षांनंतर फळाला आले. व्यासपीठावर तो क्षण जसा अनेक मराठी माणसांना गहिवरून टाकणारा होता तसाच तो बाळा नांदगावकरांसाठी देखील होता.

सृष्टी नांदगावकरची पोस्ट

दरम्यान बाळा नांदगावकर हे जुने शिवसैनिक आहेत. मात्र राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेला रामराम करणार्‍यांपैकी आणि राज ठाकरेंना अखंड साथ देणार्‍यांपैकी एक आहेत. बाळा नांदगावकर यांच्या कन्या सृष्टी नांदगावकर यांनीही बाळा नांदगावकरांच्या वचनपूर्तीच्या त्या क्षणाचा फोटो शेअर केला आहे.

'याचसाठी केला होता अट्टाहास.गेली 2 दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला.मा. बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील.' अशी एक भावूक पोस्ट ठाकरे बंधूंच्या फोटोंसह बाळा नांदगावकरांनी शेअर केली आहे.