
Raj Thackeray Ayodhya Tour: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचा 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला आहे. 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यात याबाबत अधिक तपशील सांगणार असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार होते. पण, दरम्यान, उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांनी अयोध्येत येण्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी उत्तर भारतीयांना "अपमानित" केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली होती. आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्याने ब्रिजभूषण सिंह यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याविरोधात शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझा शरयू स्नानाचा कार्यक्रम 5 जून रोजी होणार आहे. आम्ही त्यादिवशी साधू-संतांच्या उपस्थितीत शरयू स्नान करू. आता राज ठाकरे अयोध्येत येणार नसल्याने आम्ही आणखी उत्साहात कार्यक्रम साजरा करू. याशिवाय या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवसही उत्सहात साजरा करू.' (हेही वाचा - Aurangabad: औरंगाबादच्या त्याच मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा, जिथे राज ठाकरेंनी दाखवली ताकद, जाणून घ्या काय आहे खास)
दरम्यान, शिवसेना युवा नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे 22 मे रोजी पुण्यात रॅली घेणार आहेत आणि यावेळी ते त्यांच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित माहिती देणार आहेत. याआधी एप्रिलमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा 'अल्टीमेटम' दिला होता.
याशिवाय केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय-ए) प्रमुख रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना पुढील महिन्यात उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे सांगितले आहे. मनसेने 2008 मध्ये 'मराठी माणूस'ला पाठिंबा देत आंदोलन सुरू केले होते. ज्यादरम्यान कल्याण, मुंबई येथे रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतातील उमेदवारांवर कथित हल्ला करण्यात आला होता.