मनसेच्या (MNS) औरंगाबाद (Aurangabad) मधील सभेला अखेर पोलिसांनी हिरवा कंदील दिल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) देखील आज औरंगाबाद सभेसाठी मुंबईमधून रवाना होणार आहेत. थेट औरंगाबादला न जाता पुण्यात थांबणार आहेत. पुण्यामध्ये त्यांच्या काही बैठका नियोजित आहेत. त्या झाल्यानंतर राज ठाकरे औरंगाबादला जाणार आहे.
मुंबई मधून पुण्याला रवाना होताना आज मुंबईतही काही ठिकाणी राज ठाकरे थांबून मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी स्वीकारणार आहेत. औरंगाबाद मधील सभेला काल पोलिसांकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सध्या मनसेचे बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई दाखल आहेत. अमित ठाकरे देखील या सभेसाठी रवाना झाले आहेत. हे देखील नक्की वाचा: Raj Thackeray on Yogi Adityanath: राज ठाकरे यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमने; भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरुन कौतुक .
औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला पोलिसांनी 16 विविध अटी घातल्या आहेत. मनसे कडून यावर प्रतिक्रिया देताना ज्या नियमांचं पालन करणं त्यांच्या हातामध्ये आहे त्याचं पालन केले जाणार आहे.
राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. 3 मे पर्यंत हे अल्टिमेटम आहे भोंगे उतरवले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाईल असं मनसेने सांगितलं आहे. तर राज्य सरकारने भोंगे उतरवले जाणार नाहीत असं जाहीर केले आहे. याचवरून आता येत्या काही दिवसात राज्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज ठाकरे 3 मे दिवशी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत महाआरती करणार आहेत. पण भोंग्यांवरून काय होणार याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सार्यांचेच लक्ष लागले आहे.