Raj Thackeray on Yogi Adityanath: राज ठाकरे यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमने; भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरुन कौतुक
Yogi Adityanath, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackera) यांनी आता थेट उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे कौतुक करत आभारही मानले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये मशिद आणि मंदिरांवरील भोंग्यांबाबत (Loudspeaker) कडक भूमिका घेतली आहे. त्यावरुन अनेक मंदिर, मशिदींवरील भोंगे उतरविले आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ याची देशभर चर्चा आहे. महाराष्ट्रातही राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन घेतलेल्या भूमिकेमुळे ते राज्यासह देशभरात चर्चेत आहेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यामुळे या चर्चेत आता भर पडली आहे. तसेच, अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ''उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदिंवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना''. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर महाविकासाघाडीतून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Dilip Walse Patil on Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर गृहविभाग सतर्क, दिलीप वळसे पाटील म्हणाले 'आम्ही पूर्ण तयारीत')

ट्विट

राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारलाही टोला लगावला आहे. आमच्याकडे 'योगी' कोणीच नाही. आहेत ते सर्व सत्तेचे 'भोगी', असे म्हणत राज ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. राज ठाकरे हे नेहमीच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत येतात. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उडवली होती. 'नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांचे जाहीर कौतुक केले होते. आता माझी भूमिका बदलली आहे. त्यामुळे मी मोदींच्या विरोधात भूमिका घेत आहे' असेही राज ठाकरे यांनी सांगून टाकले होते. आता थेट 'यू टर्न' घेत त्यांनी भोंग्यांबाबत भूमिका घेत भाजपला पूरक राजकारण सुरु केले आहे.