महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विदर्भ दौऱ्याची आखणी केली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा भाषणशैलीमुळे राज सभा गाजवतात. त्यामुळे विदर्भातील त्यांच्या सभाही गाजतील यात शंका नाही. पण, नोटबंदीनंतर राज ठाकरे यांनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजप विरोधी भूमिका यांमुळे राज ठाकरे यांच्याकडे प्रसारमाध्यमांसह सर्वांचेच लक्ष आहे. त्यामुळे विदर्भ दौऱ्यातही राज ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, १७ ते २६ ऑक्टोबर या काळात राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असतील.

मनसेसाठी महत्त्वाचा दौरा

दरम्यान, हा दौरा मनसे आणि राज ठाकरे यांच्यासाठी आणखी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, भाजपविरोधात काँग्रेसने देशभरात उठवलेले रान आणि भाजप विरोधी इतर पक्षांनाही सोबत घेण्यासाठी घेतलेली भूमिका पाहता मनसेलाही महाआघाडीत स्थान मिळू शकते. मात्र, महाआघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत 'मनसे'ला किती प्रमाणात स्थान द्यायचे हे ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या यशापयशावरुन ठरु शकते.

राज ठाकरे काँग्रेसच्या महाआघाडीत?

दरम्यान, गेल्या महिन्यात महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी भाजपविरोधात देशभरात पुकारलेला बंद यशस्वी झाला होता. मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर काही भागात हा बंद यशस्वी करण्यासाठी मनसेनेही मोठी मदत केली होती. त्यामुळे भविष्यात भाजपविरोधात मनसे काँग्रेसच्या महाआघाडीत सहभागी होऊ शकते अशी अटकळ राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या मनसेच्या राज ठाकरेंना आघाडीत सोबत घ्यायचे की नाही, याविषयी आघाडीमध्ये वेगवेगळा मतप्रवाह असल्याचेही समजते.

दरम्यान, विदर्भ हा अलिकडे भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. या बालेकिल्ल्यातच राज ठाकरे यांनी दौरा आखल्यामुळे या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

कसा असेल राज ठाकरेंचा दौरा

अमरावती शहरात होणाऱ्या अंबा महोत्सवाला (१७ ऑक्टोबर) उपस्थितीत

अकोला, यवतमाळ बुलडाणा आदी प्रमुख शहरांसह ते विदर्भातील छोट्या-मोठ्या तालुक्यांना भेटी

मनसेचे पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका

पक्षविस्ताराच्या चर्चेबरोबरच विदर्भातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

काही ठिकाणी जाहीर सभा, पत्रकार परिषदा