पक्षादेश धुडकावून लावल्याने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. वसंत मोरे हे पुणे मनसेचे (Pune MNS) अध्यक्ष होते. गुढीपाडव्याला मुंबईतील शिवाजी पार्क येथून केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. तसेच, हे भोंगे काढले नाही तर, मनसे कार्यकर्ते भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा पटण करतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसार मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हे भोंगेल लावलेही. अपवाद फक्त पुणे मनसेच्या वसंत मोरे यांचा. वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागातील मशिदींवरील भोंगे काढण्यास तसेच, हनुमान चालीसा पठण करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावरुन राज ठाकरे नाराज झाले असून, त्यांनी वसंत मोरे यांच्यावर कारवाई केल्याचे समजते.
मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन माहिती देत, पक्षाने पुणे शहराध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याची निवड झाल्याची घोषणा केली आहे. ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! (हेही वाचा, MNS Pune: मनसेत नाट्यमय घडामोडी, वसंत मोरे यांच्यावर ना'राज' ठाकरे; बैठकीला निमंत्रण नसल्याचे वृत्त, WhatsApp ग्रुपमधूनही बाहेर पडल्याची चर्चा)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022
पुण्यातील मनसे नेत्यांना राज ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' येथे चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणात वसंत मोरे यांचे नाव नव्हते. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानेच ना'राज' ठाकरेंनी मेरे यांना निमंत्रण दिले नसल्याची चर्चा होती. पुण्यातील मनसेचे नेते बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना तातडीने शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आदेश होते. त्यामुळे भोंग्यांबद्दल घेतलेली भूमिका वसंत मोरे यांच्यासाठी अडचणीची ठरल्याची चर्चा आहे. एका बाजूला ही चर्चा असताना दुसऱ्या बाजूला वसंत मोरे हे मनसेला लवकरच सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. वसंत मोरे यांच्याकडे पुण्यातील मनसेची मोठी जबाबदारी होती.