मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरुन घेतलेल्या भूमिकेचे जोरदार पडसाद पक्ष संघटनेत उमटू लागले आहेत. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरुन हुनमान चालीसा लावल्या खऱ्या मात्र काही पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजीही व्यक्त केली. पुण्यातील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी तर थेट भूमिका घेत हुनमान चालीसा लावण्यास नकार दिला. यावरुन राज ठाकरे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. पुण्यातील मनसे नेत्यांना राज ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' येथे चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणात वसंत मोरे यांना निमंत्रण नाही. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानेच ना'राज' ठाकरेंनी मेरे यांना निमंत्रण दिले नसल्याची चर्चा आहे.
पुण्यातील मनसेचे नेते बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना तातडीने शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे समजते. यात वसंत मोरे यांचे नाव नाही. त्यामुळे भोंग्यांबद्दल घेतलेली भूमिका वसंत मोरे यांच्यासाठी अडचणीची ठरल्याची चर्चा आहे. एका बाजूला ही चर्चा असताना दुसऱ्या बाजूला वसंत मोरे हे मनसेला लवकरच सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. वसंत मोरे यांच्याकडे पुण्यातील मनसेची मोठी जबाबदारी आहे. मात्र, मोरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधूनही बाहेर पडल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे.
वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर वाद निर्माण झाला. जाहीरपणे वाद निर्माण झाल्याने मोरे यांनी ग्रुप सोडल्याचे समजते. (हेही वाचा, Raj Thackeray Sabha In Thane: ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार? संदीप देशपांडे यांनी दिले उत्तर)
मुंबई येथील शिवाजीपार्क मैदानावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी त्यावर टीका केली तर काहींनी त्याला पाठिंबाही दर्शवला. मनसे कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्याहून मोठाच संभ्रम तयार झाला. मशिदीवरील भोंगे राज्य सरकारने हटवावे नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हवतील. तसेच, त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, राज यांनी म्हटले होते. यावरुन खुद्द मनसे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती. काही पदाधिकाऱ्यांनी तर थेट राजीनामे दिले होते. पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी तर थेट उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती.