Raj Thackeray And Sean Connery (Photo Credit: Twitter)

जेम्स बाँड ही व्यक्तीरेखा पडद्यावर साकारून ती अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते सर शॉन कॉनेरी (Sean Connery) यांचे शनिवारी निधन झाले आहे. वयाच्या 90 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कॉनेरी यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कॉनेरी यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. अभिनयाच्या जोरात जगभरात पोहोचलेल्या कॉनरी यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही कॉनरी यांच्याबद्दल भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नुकताच राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात लिहले आहे की, "गॉडफादर म्हणले की मार्लन ब्रँडो यांचाच चेहरा जसा डोळ्यासमोर येतो तसे जेम्स बॉण्ड म्हणले की बॉन्डपटांच्या चाहत्यांना शॉन कॉनरीच आठवतात.

शीतयुद्धाच्या काळात इयान फ्लेमिंग ह्यांच्या पुस्तकातील ‘जेम्स बॉण्ड’ हा लोकप्रिय होणे हे स्वाभाविक होते. पण त्या नायकाचे पुस्तकातले अस्तित्व प्रतिमेच्या विश्वात शॉन कॉनरी ह्यांनी अधिक उत्कट केले, ठळक केले. शॉन कॉनरी यांनी 6 बॉन्डपट केले पण त्या बॉण्डपटातील जेम्स बॉण्ड त्यांनी इतका घट्ट रुजवला की त्यामुळे पुढे जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या प्रत्येक नटाची दमछाक झाली.

कधीही सूर्य न मावळण्याची वलग्ना करणाऱ्या ब्रिटिश साम्रज्याचा सूर्य दुसऱ्या महायुद्धानंतर मावळतीला लागला आणि अशा वेळेस जागतिक राजकारणात ब्रिटनचे महत्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे. हा भास कायम ठेवण्यात ‘इयान फ्लेमिंग’ यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि ‘शॉन कॉनरी’ ह्यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला ‘जेम्स बॉण्ड’ कारणीभूत आहे. प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखाद्या देशाची सॉफ्ट पॉवर निर्माण होणे आणि ती अनेक दशके टिकणे हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावे.

शॉन कॉनरींना पडद्यावर पाहताना प्रेक्षकाला स्वतःच्यातल्या मर्यादा, उणिवा जाणवत राहतात पण तरीही मी पण मर्त्य माणूस आहे, सगळे लोभ, मोह हे मला पण सुटले नाहीत, हे दाखवत त्यांनी ‘जेम्स बॉन्ड’ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभे केले, हे शॉन कॉनरी यांचे यश. आणि म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत. शॉन कॉनरी यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली,” अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. देखील वाचा- Chandrakant Patil On Pankaja Munde: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतूक केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

राज ठाकरे यांचे ट्विट-

कॉनरी यांचा जन्म 25 ऑगस्ट 1930 रोजी ब्रिटनमध्ये झाला होता. 1962 ते 1983 या कालावधीतील त्यांनी बाँडपटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या. एका सर्वेक्षणानुसार, जेम्स बाँड साकारणाऱ्या नायकांमध्ये शॉन कॉनरी सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. त्यांना 44 टक्के लोकांनी शॉन कॉनरी यांना पसंती दर्शवली होती. तर, टिमोथी डाल्टन आणि पिअर्स ब्रॉन्सन हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जेम्स बाँड ठरले होते.