Bharat Ratna for Ratan Tata: रतन टाटा यांचं मुंबईत काल निधन झाल्याचं वृत्त येताच अनेक सामान्य भारतीय हळहळ व्यक्त करत आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रतन टाटांच्या पार्थिव दर्शनानंतर X वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना एक पत्र लिहित टाटांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी 'अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत. तसंच एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.' असं म्हटलं आहे.
दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील केंद्राकडे रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव संमत झाला आहे. रतन टाटा यांना केंद्र सरकार कडून पद्म विभूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. पण त्यांचा सन्मान 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने व्हावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
राज ठाकरे यांची मागणी
प्रति,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा… pic.twitter.com/R78wpWUnCm
— Raj Thackeray (@RajThackeray) October 10, 2024
राज ठाकरे आणि रतन टाटा यांचे जुने स्नेह आहे. टाटांनी नाशिक मध्ये मनसे कडून महापालिकेत सत्ता असताना बॉटनिकल गार्डन उभारले होते त्याला टाटांनीच सीएसआर फंडातून निधी दिला होता. त्यानंतर नाशिकला भेट देत त्यांनी ठाकरेंचं कौतुक देखील केले होते. आज टाटांच्या निधनानंतर या जुन्या आठवणींना देखील उजाळा देत व्हिडिओ शेअर केला आहे.
रतन टाटा यांना अजून का नाही मिळाला भारतरत्न?
फेब्रुवारी 2021 मध्ये, रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा यासाठी ऑनलाईन मोहिम सुरू होती. त्यावेळी टाटांनी स्वतः दखल घेत नम्रपणे त्यांच्या समर्थकांना याबाबतचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले. “सोशल मीडियात काहींनी भारतरत्न पुरस्काराबाबत व्यक्त केलेल्या भावनांची मी कदर करत असताना, अशा मोहिमा बंद कराव्यात अशी मी नम्र विनंती करू इच्छितो. त्याऐवजी, मी स्वत:ला भाग्यवान समजतो की एक भारतीय आहे आणि भारताच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी प्रयत्न करत आहे आणि योगदान देत आहे.” असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते.