My Lady Han Boat | (Photo Credit -ANI/Twitter)

रायगड (Raigad ) जिल्ह्यातील श्रीवर्धन (Shrivardhan ) तालुक्यात असलेल्या हरीहरेश्वर (Harihareshwar) येथील किनारपट्टीवर (Shrivardhan Beach) आढळलेल्या त्या संशयीत बोटीचा छडा लागला आहे. या बोटीची मालकी आणि तिचा प्रवास याबद्दल उकल झाली आहे. तरीही या बोटीशी संबंधीत अनेक गोष्टी तपासल्या जाणार आहेत. या बोटीच्या अनुशंघाने उत्पन्न झालेल्या सर्व शंका आणि शक्यता गृहीत धरुन तपास केला जाणार आहे. या तपासाची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक म्हणजे एटीएसकडे (Maharashtra ATS) आली आहे. महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची (Raigad Suspect Boat Case) पाहणी केली आहे. या बोटीमुळे राज्यात आणि पर्यायाने देशात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची योजना तर नाही ना? अशी प्रश्नार्थक शंका घेतली जात होती. त्यामुळे या संशयास्पद बोटीचे गुढ वाढले होते.

बोटीबद्दल शंका उत्पन्न होण्यास काही कारणेही महत्त्वाची ठरली. मूळ म्हणजे ही बोट अत्यंत संशयास्पदरित्या किनारपट्टीवर आली. दुसरे असे की, या बोटीवर एकही व्यक्ती आढळला नाही. मात्र, काही कागदपत्रे आणि तीन एके-४७ आढळल्या. काही जीवंत काढतुसेही मिळाली. त्यामुळे संशय अधिकच वाढला. अनेकांनी, खास करुन प्रसारमाध्यमांनी या बोटीचा संबंध थेट दहशतवादी कारवायांशी लावला. आतापर्यंत हाती आलेल्या आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार तरी तसे काही पुढे आली नाही.

दरम्यान, या बोट प्रकरणामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा आणि सरकार एकदम अलर्ट मोडवर आले. राज्य सरकारने राज्यभरात हायअलर्ट जारी केला. तसेच, केंद्र सरकार, राज्य सरकार यासोबतच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीसांनीही एकमेकांच्या संपर्कात राहात जोरदार हालचाली सुरु केल्या. मात्र, ही बोट ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीच्या मालकीची असल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. (हेही वाचा, Suspicious Boat Harishwar Beach: मस्कत येथून युरोपकडे निघालेली 'लेडीहान' रायगड जिल्ह्यात धक्क्याला, हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोटीचा लागला छडा)

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील किनारपट्टीवर आलेली बोट इंजिन बिघडल्याने नादुरुस्त झाली होती. त्यामुळे समुद्री प्रवाहाने तरंगत ती हरिहरेश्वर येथे आली. या बोटीचे नाव 'लेडीहान' (My Lady Han) असे असून, तिची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेकडे आहे. या महिलेचा पती जेम्स हार्बट (James Harbutt) हा या बोटीचा कप्तान होता. मस्कत येथून युरोपच्या दिशेने निघालेली ही बोट प्रवासात असताना तिचे इंजिन बंद पडले. त्यामुळे समुद्रातून दिशाहीनपणे प्रवास करताना एका कोरीयन जहाजाने या बोटीवरील नागरिकांना सोबत घेतले. त्यांचे प्राण वाचले मात्र, ही बोट त्यांना सोबत घेता आली नाही. त्यामुळे साधारण 16 मिटर लांबीची ही बोट समुद्री प्रवाहासोबत भरकटत वाहू लागली. बोटीवर काही कागदपत्रे 3 एके-47 रायफल आणि काही काडतूसे तसेच इतरही काही गोष्टी आढळून आल्या आहेत.