(Photo Credit - Pixabay)

रायगड: पेण शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या सनसिटी भवन येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएम (Robbery at ATM) केंद्रावर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी एटीएममधून 56 लाखांची रोकड (56 lakh Cash Stolen) हिसकावून घेतली. दरोड्याची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी पोहोचले. गेल्या महिन्यात पेण तालुक्यातील तरणखोप येथील घरातून लाखो रुपयांची चोरी झाली होती. पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील आठ दुकानेही चोरट्यांनी एकाच रात्री फोडून रोख रक्कम लुटली. ही घटना ताजी असतानाच शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरला दरोडेखोरांनी लक्ष्य केले.

गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीनची तोडफोड करून 56 लाखांहून अधिक रुपयांची रोकड लुटण्यात आली. दरोडेखोरांनी सोबत आणलेले गॅस कटर आणि सिलिंडर एटीएम सेंटरमध्ये फेकून दिले. पेण शहरात अशा अनेक चोरीच्या घटना घडल्याने चोर, दरोडेखोरांनी पेण पोलिसांसमोर एकप्रकारे आव्हान उभे केले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही तपास करत आहेत. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून 56 लाख रुपयांची रोकड पळवली. या प्रकरणाच्या तपासातून दरोडेखोरांना जेरबंद करण्यास निश्चितच मदत होईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. (हे ही वाचा Corona Virus Update: पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशांना आता कोरोना लसीचे दोन्ही डोस पुर्ण असणे अत्यावश्यक)

बँक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

एटीएममधील दरोड्यामुळे बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. बँक अधिकाऱ्यांनी एटीएम सेंटरमध्ये साधे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. याचा फायदा दरोडेखोरांनी घेतला. कर्तव्यात निष्काळजी पणा करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेच्या अधिकाऱ्यांवर बँक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.