राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबई (Mumbai) येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होणाऱ्या सभेनंतर समाप्त होईल. या सभेला इंडिया आगाडी आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे प्रमख नेते उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांचा समावेश आहे. या शिवाय डावे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे देखील या सभेस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याच निवडणुकीत महाविकासआघाडी लोकसभा निवडणूक 2024 चे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे.
शिवाजी पार्क येथील जाहीर सभा प्रमुख आकर्षण
शिवाजी पार्कवर सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रा सांगता सभेपूर्वी मुंबईमध्ये आज सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान 'न्याय संकल्प' पदयात्रा काढण्यात येईल. पदयात्रा असली तरी शिवाजी पार्क येथील जाहीर सभा हेच खरे प्रमुख आकर्षण असणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी काँग्रेस आणि महाविकासआघाडीने जोरदार तयारी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सभेसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांमधील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेत राहुल गांधी काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi Thane Sabha: अदानी नव्हे 'मोदानी', विमानळ, पोर्ट, सगळी कंत्राटं एकाच व्यक्तीस; राहुल गांधी यांचे ठाणे येथून टीकास्त्र)
कोण कोण राहणार उपस्थित?
शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
उद्धव ठाकरे- शिवसेना (UBT)
प्रियंका गांधी- काँग्रेस
तेजस्वी यादव (उपमुख्यमंत्री, बिहार) - राष्ट्रीय जनता दल
एम. के. स्टॅलिन (मुख्यमत्री, तामिळनाडू) - द्रविड मुन्नेत्र कळघम
चंपई सोरेन (मुख्यमंत्री, झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा
अखिलेश यादव (विधानसभा विरोधी पक्षनेते, उत्तर प्रदेश)- समाजवादी पार्टी
फारूक अब्दुल्ला (जम्मू कश्मीर, ज्येष्ठ नेते)- नॅशनल कॉन्फरन्स
कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी)- झारखंड मुक्ती मोर्चा
सौरभ भारद्वाज (आमदार)- आम आदमी पक्ष
दिपांकर भट्टाचार्य-
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक (2024) प्रक्रियेची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहिता जाहीर लागू झाली आहे. दरम्यान, देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीची पहिलीच जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होत आहे. त्यामुळे या सभेत राहुल गांधी यांच्यासह इतर नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा अशा दोन यात्रांच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी देशातील तळागाळातील जनतेशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याचे पर्यावसन या निवडणुकीत कसे पडते याबाबत उत्सुकता आहे.