जयपूर येथील रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप (BJP), केंद्र सरकार आणि हिंदुत्व (Hindutva) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हा देश हिंदुंचा आहे. हिंदुत्ववाद्यांचा नाही. 2014 पासून देशामध्ये हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे. त्यामुळे आता आपल्याला पुन्हा एकदा देशात हिंदुंचे सरकार आणायचे आहे, असा घणाघात करत राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्व (Hinduism) यातील फरकही समजावून सांगितला. महात्मा गांधी हे हिंदू होते तर त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता. हिंदुत्ववाद्यांना सत्य नको असते त्यांना केवळ सत्ता हवी असते. हिंदू नेहमीच सत्याच्या बाजूने राहतो. तो कधीही घाबरत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
राजस्थानमध्ये जयपूर येथे आयोजित 'महागाई हटाओ रॅलीत' राहुल गांधी बलोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले. मी हिंदू आहे. हिंदुत्ववादी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे तीन चार मित्र देश बर्बाद करत आहेत. सात वर्षांपासून ते हेच करत आले आहेत. देशात महागाई आहे. देशातील जनता दु:खी आहे. हे काम हिंदुत्ववाद्यांनी केले आहे. हिंदुत्त्ववाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी असते. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. (हेही वाचा, PM Narendra Modi's Twitter Hacked: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक; PMO कडून खुलासा)
हिंदू आणि हिंदुत्व हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. जसे की दोन जीवांमध्ये एक आत्मा असू शकत नाही. त्याच पद्धतीने दोन्ही शब्दांचा अर्थ कधीही एक असू शकत नाही. कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा असतो. लक्षात ठेवा हिंदू कधीही घाबरत नाही. तो कोणालाही घाबरवत नाही. हिंदुत्ववादी घाबरतो आणि घाबरवतोसुद्धा. जो घाबरतो तोच भीतो आणि त्यालाच भीती दाखवली जाते, असेही राहुल गांधी म्हणाले.
ट्विट
Hindutvavadis only want power and they are in power since 2014. We need to throw these Hindutvavadis out of power & bring back Hindus: Congress leader Rahul Gandhi at the party rally in Jaipur pic.twitter.com/FyxWfw4MJG
— ANI (@ANI) December 12, 2021
उत्तर प्रदेश, राजस्थानसह विविध राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. भारतीय निवडणूक आयोगाकडून पुढील काही दिवसांमध्येच या निवडणुक कार्यक्रमाची घोषणा होईल. दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.