पुण्यामध्ये 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र सुरुवातीपासूनच पुणेकर हेल्मेट सक्तीच्या (compulsory helmet rule) विरोधात आहेत. स्थानिकांसोबतच पुण्यात राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांनी हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे.हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकर 3 जानेवारीला विनाहेल्मेट रॅली काढण्याचा निर्णय पुणेकरांनी घेतला आहे . पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी ही रॅली काढून हेल्मेट सक्ती विरोधात प्रदर्शन केले जाणार आहे.
हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत रॅली काढून विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली तेव्हापासूनच पुणेकरांनी त्याला विरोध दर्शवला होता. हेल्मेट सक्ती हटवण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनाही निवेदन देण्यात आलं होतं. हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच मत आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन पुणेकर करत असून, हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी मागणी हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने केली आहे.
भारतामध्ये सुमारे 35 हजार मृत्यू हेल्मेट न घातल्याने होतात. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या पुणेकर हेल्मेटसक्ती पेक्षा दंडात्मक कारवाई भरणं पसंत करत आहेत.