PMP Bus (Photo Credits: Wikimedia)

मागील 2 महिन्यांपासून पुण्यासह राज्यात लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान ही लाट आता ब-यापैकी ओसरली असल्याने महाराष्ट्र आता अनलॉकच्या टप्प्यात आहे. त्यामुळे पुण्यात बंद ठेवण्यात आलेली पीएमपी (PMP) बससेवा देखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बस प्रवाशांना पुन्हा पास काढायला लागून त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून पीएमपीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात लॉकडाऊनपूर्वीच्या बस पासेसवर मुदतवाढ मिळणार आहे.

या निर्णयामुळे पुणे शहरातील हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पास केंद्रावरून पीएमपीचे बस पासेस काढलेले आहेत. परंतु, 3 एप्रिल रोजी अचानक राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अशा बस पासधारकांना बस पासचा वापर करता आलेला नाही.हेदेखील वाचा- Pune Unlock: पुणेकरांना दिलासा! 14 जून पासून कोविड निर्बंध होणार अधिक शिथिल; पहा काय सुरु काय बंद?

त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी पास काढलेल्या नागरिकांना मुदत वाढ देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पण त्यासाठी प्रवाशांना पास केंद्रांवरून जाऊन आपल्या पासची मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे. पास धारकांनी 20 जूनपर्यंत संबंधित पास केंद्रात जाऊन आपल्या पासची मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे. कारण 20 जूननंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. पास धारकांनी अर्ज केल्यानंतरचं त्यांना मॅन्युअल आणि मी-कार्डची मुदत वाढवून मिळणार आहे. त्यासाठी पासधारकांनी अर्ज आणि मुळ पाससह संबंधित पास केंद्रातून मुदत वाढवून घ्यावी, असं आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.