ऑनलाईन फसवणुकीची एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येत आहे. डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या एका व्यक्तीमुळे एका महिलेने तब्बल काही लाख रुपये गमावले आहेत. रिपोर्ट्सनुसार, गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून या दोघांची ओळख झाली. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने महिलेला तो अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन असल्याचे सांगितले होते. तसंच लग्न करुन भारतातच स्थित होण्याचे वचनही वारंवार तो महिलेला देत होता. मात्र त्याचा डाव काही वेगळाच होता. फसवणूक करुन त्याने महिलेकडून चक्क 12 लाख रुपये लुटले.
आईच्या उपचारासाठी, औषधं घेण्यासाठी, व्यवसाय सुरु करण्यासाठी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने विविध कारणास्तव पीडित महिलेकडे पैसे मागितले. तब्बल 12.3 लाख रुपये दिल्यानंतर आपण फसवलो गेलो आहोत, याची महिलेला जाणीव झाली. (Pune: डेटिंग अॅपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरूणाला पडले महागात; नेमके काय घडले? वाचा सविस्तर)
फसवणूक झाल्याची जाणीव होताच महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि वाकड पोलिस स्थानकात ऑनलाईन फसवणूकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून आरोपीचा शोधही सुरु आहे. दरम्यान, इन्स्पेक्टर संतोष पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेस शी बोलताना सांगितले की, तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार आम्ही विविध गोष्टी पडताळून पाहत आहोत.
दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यापूर्वी डेटिंग अॅपवरुन तरुणीशी मैत्री करणे एका तरुणाला महाग पडले होते. चैन्नईत राहणाऱ्या एका तरुणाकडून दीड लाखांचा ऐवज लुटून तरुणी फरार झाल्याचे उघडकीस आले होते. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना, ऑनलाईन ओळखीत कोणावरही विश्वास टाकताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.