Pune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI))

दोन भावंडांसह पित्याचा धबधब्याजवळील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पुणे (Pune) येथून समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कामशेत (Kamshet) जवळील कुसगावात (Kusgaon) रविवारी दुपारी ही घटना घडली. पिराजी सुळे (36) असे मृत पावलेल्या पित्याचे नाव असून त्यांच्यासह मुलं साईनाथ (13), सचिन (10) यांचा देखील मृत्यू झाला आहे. पिराजी हे रोजंदारी मजूर असून आज सकाळी ते आपल्या मुलांसह कुसगावजवळील डोंगराळ भागात असलेल्या धबधब्यावर गेले होते.

डोंगराच्या पायथ्याशी एक मोठा खड्डा होता. परंतु, सतत पडलेल्या पावसामुळे या खड्डयात पाणी भरले होते. सुळेंच्या दोन्ही मुलांनी या खड्डयात पाय ठेवला असता ते बुडू लागले. त्यावेळेस त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या वडीलांनी पाण्यात झेप घेतली. परंतु, त्यांना वाचवताना सुळे देखील बुडू लागले. गुरांना चरण्यासाठी घेऊन आलेल्या एका गावकऱ्याने सुळेंना बुडताना पाहिले. त्याने त्वरीत इतरांना गावकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. गावकऱ्यांनी मिळून या तिघांना पाण्यात बाहेर काढले आणि जवळील रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती कामशेत पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 5 वर्षांचा मुलगा आहे. सुळे हे मुळचे नांदेडचे असून कामासाठी सध्या कामशेत येथे स्थायिक झाले आहेत. (Raigad: मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात 5 वर्षांच्या मुलीसह 2 जण गेले वाहून)

दरम्यान, सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात दरडी कोसळून अनेक दुर्घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजून काहींची भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.