पुणे (Pune) शहरातील कोयता गँगचे (Koyta Gang) लोन आता शालेय विद्यार्थ्यांपर्यंतही पोहचल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेले कोयता गँग आकर्षण सामाजिक चिंतेचा विषय ठरला आहे. केवळ मैत्रिणीशी बोलतो येवढ्याच कारणावरुन चिडलेल्या एका एका अल्पवयीन मुलाने शालेय विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले आहेत. या घटनेमुळे पुणे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही मुलेही शालेय विद्यार्थी आहेत. धक्कादायक म्हणजे दोघांमध्ये अगदीच किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यातून हे भांडण चक्क कोयत्याने हल्ला होण्यापर्यंत गेली.
पुणे येथील नुतन मराठी विद्यालय (नुमवी) या शाळेतील विद्यार्थ्यावर कोयत्याने वार झाल्याचे समजते. या हल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्या विद्यार्थ्यावर हल्ला झाला तो विद्यार्थी इयत्ता 12 वी मध्ये शिक्षण घेत आहे. तर ज्याने हल्ला केला तो मुलगा तुळशीबाग येथे एका ठिकाणी कामाला आहे. हल्ला करणारा मुलगाही अल्पवयीनच आहे. पीडित मुलगा हा एका मैत्रिणीशी बसस्टॉपवर बोलत उभा होता. मैत्रिणीशी बोलत असल्याचे पाहून राग अनावर झाल्याने या मुलाने शालेय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. सदर मुलाला थांबविण्यासाठी बाजूचा एक मुलगा पुढे आला. परंतू, या झटापटीत त्यालाही कोयता लागल्याने तोही जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ज्याच्यावर कोयता हल्ला केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, Pune Shocker: पुण्यात राहत्या घरात कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या; मुंढवा परिसरातील धक्कादायक घटना)
पाठिमागील काही महन्यांपासून पुणे शहरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्येही कोयता गँगची दशहत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलिसांनी वेळीच उपाययोजना करुन कोयता गँगमधील तरुणांना आळा घालावा अशी मागणी होत आहे. असे असतानाच आता शालेय विद्यार्थ्यांपर्यंतही हे लोन पोहोचल्याने पुण्यातील सामाजिक वर्तुळातून काळजी व्यक्त होत आहे. दरम्यान, विधिसंघर्षग्रस्त 7 जण हे बाल सुधारगृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळाले आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून विधिसंघर्षग्रस्तांची संख्या वाढताना दिसते आहे.