Baby | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इथल्या दौंड (Daund) शहरात 10-12 नवजात बालकांना (Newborns) प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून कचऱ्यात फेकण्यात आल्याचे समोर आले आहे. मंगळवारी ही बाब उघडकीस आली. यावरून दौंड शहर परिसरात बेकायदेशीर गर्भपात केंद्र सुरू असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पोलीस सध्या अधिक माहितीचा शोध घेत आहेत. दौंड शहरातील बोरावके नगर परिसरात नवजात अर्भके आढळली. या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडिया एक्सवर या घटनेबाबत भाष्य केले. त्या म्हणतात, ‘दौंड शहराजवळ बोरावकेनगर भागात कचऱ्यामध्ये अर्भके फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हे अतिशय घृणास्पद कृत्य आहे. याबाबत तातडीने तपास करुन संबंधितांवर कठोर कारवाई होते आवश्यक आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी कृपया या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून याबाबत कारवाई करावी ही विनंती.’

सुप्रिया सुळे यांची कारवाईची मागणी-

खालील दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात-

हे संतापजनक प्रकरण समोर आल्यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव ददास, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती गोळा केली. सोनोग्राफी अहवाल हे सर्वसाधारणपणे उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असतात, त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनाही तात्काळ घटनास्थळी बोलावण्यात आले. ही अर्भके कोणत्या रुग्णालयाने फेकून दिली हे अद्याप समोर आलेले नाही व पोलीस त्याचा तपास सुरू ठेवत आहेत. (हेही वाचा: Man Dies After Inhaling Carbon Monoxide: असाध्य आजाराने ग्रस्त व्यक्तीने केली विषारी वायूचे श्वसन करत आत्महत्या; वसई मधील घटना)

याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले की, सदर ठिकाणी बरणीमध्ये एक मृत अर्भक सापडले असून, बाकी अन्य बरण्यांमध्ये शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेले मानवी अवयवांचे तुकडे आढळले आहेत. दौंडमध्ये कोणतीही मोठी लॅब नाही, इथे कोणतेही मोठे मेडिकल कॉलेजही नाही, त्यामुळे ही अर्भके बाहेरून कोणीतरी या ठिकाणी आणून टाकली असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.