Pune-Shirdi-Nagpur Flight: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; 18 फेब्रुवारीपासून सुरु होणार पुणे-शिर्डी-नागपूर दैनंदिन विमानसेवा
Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

पुण्यावरून शिर्डी किंवा नागपूरला प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक दिलासादायक बाब आहे. 18 फेब्रुवारीपासून एअर इंडिया पुणे-शिर्डी-नागपूर या तीन शहरांदरम्यान दैनंदिन विमानसेवा (Pune-Shirdi-Nagpur Flight) सुरू करणार आहे. यामुळे पुणेकरांसाठी शिर्डी साईबाबांची (Shirdi Sai Baba) यात्रा आता अधिक सोयीस्कर होणार आहे. हा शिर्डी विमानतळाला नवीन जोडलेला मार्ग असेल जो आतापर्यंत बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईसाठी उड्डाणे चालवत होता.

पुणे आणि नागपूर येथील भाविकांकडून शिर्डीसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. आता एअर इंडिया ही सेवा पुरवणार आहे. विमानतळ विकास प्राधिकरणाने आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. शिर्डी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली. महामारीमुळे शिर्डी विमानतळ बंद ठेवण्यात आले होते, जे ऑक्टोबर 2021 मध्ये पुन्हा सुरू झाले. या विमानतळावर बेंगळुरूहून दोन आणि दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद येथून प्रत्येकी एक उड्डाणे आहेत.

आता पुण्याहून येणारे विमान शिर्डी येथे थांबेल आणि नंतर नागपूरला जाईल. नागपूरहून परतीचे उड्डाणही त्याच दिवशी असेल. नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, शिर्डी विमानतळावर IMD व्हिज्युअल रेंज बसवण्याचे काम सुरू आहे. शिर्डी विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे काम जोरात सुरू आहे आणि लवकरच रात्रीच्या लँडिंगची सुविधा उपलब्ध होईल. (हेही वाचा: Mumbai Water Taxi: बहुप्रतिक्षित मुंबई वॉटर टॅक्सी सेवेचे 17 फेब्रुवारी रोजी उद्घाटन; जाणून घ्या मार्ग व दर)

पुण्याहून दर आठवड्याला साई बाबांच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक असल्याने शहरातील साई भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘मला आनंद आहे की विमान प्रवासामुळे माझा प्रवास आरामदायी होईल आणि एअर कनेक्टिव्हिटीमुळे मी माझ्या सोयीनुसार नागपूरला व्यावसायिक ट्रीपचे नियोजन करू शकतो, त्यामुळे माझा प्रवासाचा वेळ वाचेल’, असे नियमित प्रवासी असलेल्या जाहिरात फर्मचे मालक अमोल पाटील म्हणाले.