
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे (Pune) शहराला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार करून तिघांनी तिची हत्या केल्याचे वृत्त आहे. या क्रूर हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली असून या पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. यासह, त्यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे.
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स या ठिकाणी ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे असे मृत तरुणीचे नाव आहे. क्षितिजा नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी इथे आली होती. त्यावेळी 22 वर्षीय आरोपी शुभम भागवतही त्या ठिकाणी आला व त्याने क्षितिजाला बाजून घेऊन बोलायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला व काही कळायच्या आतच आरोपीने कोयत्याने क्षितिजावर वार केले.
या हल्ल्यामध्ये क्षितिजाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला. आरोपीजवळ पिस्तुल असल्याची माहितीही मिळत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की या आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या दूरच्या नातेवाईकाचे 'एकतर्फी' प्रेम हे निर्घृण हत्येमागील कारण असू शकते. (हेही वाचा: Husband Attacks Wife: सुशिक्षित पत्नीवर पतीचा हल्ला, पुणे येथील मुकुंदवाडी परिसरातील घटना)
दरम्यान, या घटनेबाबत पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणे हे सामाजिक अध:पतनाचे गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणे हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल.’