पोलिसांनी जप्त केलेला शस्त्रसाठा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर येथे, पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) संयुक्त पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. राजाराम अभंग (वय 60) नामक व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक गन, पाईप, बॉम्ब बनवण्याचे साहित्य, तलवार, कोयता, भाले, डेटोनेटर्स, गनपावडर इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन 2003 साली या व्यक्तीने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना अभंग याच्याकडे स्फोटक साहित्य असल्याची माहिती मिळाली होती.

2003 साली आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, या कारणावरून त्या व्यक्तीला मारण्यासाठी राजारामने बॉम्ब बनवला होता. त्या बॉम्बस्फोटानंतर त्याच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये राजाराम अभंग तीन वर्षे येरवडा कारागृहात होता. मात्र आता कोणत्या कारणासाठी तो स्फोटके बाळगून होता याचा तपास पोलीस करत आहेत. (हेही वाचा: भाजप नेत्याच्या घरावर छापा टाकून 17 बॉम्बसह, 116 काडतुसे जप्त; मोठे षडयंत्र आखण्याचा डाव उधळला)

या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान सोमवारी मध्य प्रदेश राज्यातही पोलिसांनी अशीच कामगिरी केली. भाजप नेते संजय यादव (Sanjay Yadav) यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 13 पिस्तुल आणि 116 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.