Pooja Chavan (Photo Credit: Instagram)

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) पुणे पोलिसांनी अरुण राठोड (Arun Rathod) ला ताब्यात घेतलं आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर अरुण राठोड गायब झाला होता. मात्र, आता पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाई करत अरुणला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर कथित मंत्री आणि अरुण राठोडच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. यात कथित मंत्र्याने अरुणचा उल्लेख केला होता. या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अरुणशिवाय विजय चव्हाण या व्यक्तीचादेखील उल्लेख आहे. (वाचा -Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड गुरुवारी बोलणार असल्याची माहिती- अजित पवार)

पूजाच्या आत्महत्येनंतर तिच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दरम्यान, टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता आहे. संजय राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचंही म्हटलं जात आहे.

अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजा सोबत राहत होता. पूजाला काय हवं नको हे पाहण्याचं काम अरुणकडे सोपवण्यात आलं होतं. पूजाच्या राहण्याची व्यवस्था कथित मंत्र्याने अरुण राठोड याच्याकडे सोपवली होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात अरुणाचा काय संबंध होता, याचा तपास सध्या पुणे पोलिस करत आहेत.