Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

पुणे (Pune) येथील बालेवाडी (Balewadi) येथे एका मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार भरधाव चालवत एका निवृत्त पोलीस निरिक्षकाने दुचाकी स्वाराला धडक (Road Accidents) दिली. ही धडक इतकी भयावह होती की, दुचाकी स्वार सुमारे 100 मीटर दूर फरफटत गेला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर , इतर 5 जण जखमी झाले. या पाचपैकी दोघांची स्थिती चिंताजनक आहे. अपघात घडतानाही कारचालकाचे आपल्या वाहनावर नियंत्रण नव्हते. अखेर रस्त्यावर थांबलेल्या टेम्पोला धडक दिल्यावर कुठे कार (Car Accident) जागेवर थांबली. हा अपघात रविवारी दुपारी एक वाजता बालेवाडीतील ममता चौकात घडला.

एस.डब्ल्यु.निकम असे या निवृत्त पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. अपघात घडला त्या वेळी निकम हा स्वत: गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या भीषण अपघातात संतोष राठोड (वय 35, रा.काळेवाडी) या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. याशिवय राजेश सिंग (वय 37 रा. ताथवडे), आनंद भांडवलकर (वय 35, बाणेर), दशरथ माने (रा.बाणेर) अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एस.डब्ल्यु.निकम हा त्याच्या कारने (एम. एच 14 एच. एस.7699) बालेवाडी परिसरातील हायस्ट्रीट येथून निघाला होता. या वेळी त्याने अधिक प्रमाणावर मद्यसेवन केले होते. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असलेल्या एस.डब्ल्यु.निकम याने समोरुन जात असलेल्या दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार आणि त्याच्यापाठी बसलेला व्यक्ती खाली कोसळली. मात्र, दुचाकीस्वार मात्र, दुचाकीतच अडकला आणि जवळपास 100 मिटर फरफटत गेला. (हेही वाचा, पुणे: वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; एकाचा मृत्यू)

धक्कादायक असे की, भरधाव वेगात असलेली कार दुचाकी स्वाराला धक्का देऊनच थांबली नाही. तर, ममता चौकात असलेल्या रस्त्याकडेच्या पंक्चरच्या दुकानात घुसली. या दुकानात पंक्चर काढणाऱ्या मुलासोबत आणखी तीन चार व्यक्ती होत्या. या कारने दुकानातील सर्व व्यक्तींना उडवले. ही कार दुकानातून बाहेर पडत बाजूला उभ्या असलेल्या टेम्पोला धडकली आणि मग थांबली.