देशातील अनेक नेत्यांची मागील काही दिवसात सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या निधीची सीबीआय (CBI) आणि ईडीमार्फत (ED) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. यावर पुण्यातील महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही कोणत्याही चौकशीला तयार असून पुणे महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली आहे", असेही मोहोळ म्हणाले आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, "सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ईडीमार्फत करण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महानगरपालिका आल्यानंतर पुणे शहराच्या कचरा प्रक्रियेची क्षमता 1200 मेट्रिक टनावरून 1800 मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली. याचीही माहिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात 'एक्टिव्ह' होत असलेल्या सुप्रियाताईंनी घ्यावी. आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे", अशीही टीका त्यांनी केली आहे. हे देखील वाचा- Mumbai: बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 24 जुलैपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचा आदेश
मुरलीधर मोहोळ यांचे ट्वीट-
सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत !
पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 28, 2021
सुप्रिया सुळे यांनी आज पुणे शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.