Death | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

घरामध्ये कीटकांचा उपद्रव टाळण्यासाठी पेस्ट कंट्रोल करण्याचा पर्याय निवडला जातो पण पुरेशी काळजी न घेतल्यास हा पर्याय जीवावर बेततो. पुण्यामध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. दरम्यान पेस्ट कंट्रोलनंतर  काळजी न घेतल्याने पुण्यात मजली दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिबडेवाडी येथील गणेश विहार सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा अविनाश मजली (वय 54) यांचा समावेश आहे. दरम्यान उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जाताना 1 किमीच्या अंतरावरही 45   मिनिटांचा वेळ लागल्याने वेळेत उपचार मिळू शकले नाहीत.

पुण्यात राहणार्‍या मजली कुटुंबाने मंगळवार (11 फेब्रुवारी) दिवशी पेस्ट कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते दोघेही नातेवाईकांच्या घरी रहायले गेले होते. मात्र काही तासांतच ते पुन्हा परतले पण घरात विषारी द्रव्यांचा वास तसाच होता. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर पुढील काही तास काळजी घेणं आवश्यक असते परंतू मजली कुटुंबाने त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने काही काळाने ते चक्कर येऊन पडले. दरम्यान ही गोष्ट त्यांच्या मुलीला समजताच तिने दोघांनाही पुण्याच्या सह्याद्री रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी बिबडेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान झुरळ,पाली, मुंग्या यांचा घरामधील उपद्रव कमी करण्यासाठी पेस्ट कंट्रोल केले जाते. केमिकल पेस्ट कंट्रोलमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता विविध नॉन केमिकल पर्याय देखील उपलब्ध आहेत. मात्र पुरेशी काळजी न घेणं जीवावर बेतू शकते. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरामध्ये खिडक्या उघड्या ठेवणं, फॅन लावणं आवश्यक आहे. यामुळे घरात घुमणारा वास बाहेर पडण्यास मदत होते.