Pune Lok Sabha By-Election 2023: पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक (Pune Lok Sabha Constituency) लागणार की थेट 2024 ची मुख्य निवडणूकच होणार याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधीत्व करत होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने हा मतदारसंघ आता रिक्त झाला आहे. रिक्त मतदारसंघात निवडणूक पोटनिवडणूक लागू करण्यासही काही कायदे आणि नियम आहे. त्यामुळे या नियमांच्या आधारावर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 151(A) सांगते की जर मुख्य निवडणुकीसाठी एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी असेल तर रिक्त मतदारसंघात निवडणूक घ्यावी लागते. या कायद्याचा विचार करता लोकसभा निवडणूक 2024 ला अद्याप एक वर्षांहून अधिक काळ बाकी आहे. परिणामी गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवणूक लागण्याची चन्हे अधिक आहेत. घटनेचे अभ्यासक सांगतात की ही निवडणूक येत्या सहा महिन्यांच्या आत घ्यावी लागेल. (हेही वाचा, Life Journey of Girish Bapat: टेल्को कंपनीचा कामगार ते आमदार; खासदार गिरीश बापट यांचा वळणदार राजकीय प्रवास)
दरम्यान, बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लागणाऱ्या संभाव्य पोटनिवडणूक अथवा निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाल सुरु झाली आहे. अनेक इच्छुकांनी गळ टाकून ठेवायला सुरुवात केली आहे. या जागेवरुन माजी खासदार अनिल शिरोळे, विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, स्वरदा केळकर यांच्याहस इतरही काही भाजप नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भाजप कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतो याबाबत उत्सुकता आहे.
दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीही या ठिकाणी कोणाला उमेदवारी देते याबाबत उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोट-निवडणुकीत भाजप उमेदवाराला महाविकासआघाडीने धूळ चारली आहे. त्यामुळे आता पोटनिवडणुक झाल्यास मविआ कशी आखणी करते याबाबत उत्सुकता आहे.