महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना विषाणू (Coronavirus) चा उद्रेक वाढत आहे. पुणे (Pune), मुंबई (Mumbai) अशा शहरांमध्ये आरोग्य सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. पुण्यात बेड्सची कमतरता असल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण घरीच आयसोलेशनमध्ये (Home Isolation) राहण्यासाठी आग्रही आहेत. मात्र यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने प्रशासन एक नवीन नियम लागू करू शकते. पुणे महानगरपालिका कोविड-19 रुग्णांना होम क्वारंटाईनचा पर्याय देऊ शकते, मात्र त्यासाठी त्यांना 25 हजाराच्या बाँडवर सही करावी लागेल. याचाच अर्थ रुग्णांनी जर का होम क्वारंटाईनच्या नियमांचे पालन केले नाही तर, त्यांच्याकडून 25,000 दंड वसूल केला जाईल.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अतिरिक्त नगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोविड-19 रुग्णांवर वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून त्यांचे परीक्षण केले जाईल. या पार्श्वभुमीवर, जर एखादा रुग्ण घरी आयसोलेट असताना घराबाहेर पडल्यास, तसेच इतरही काही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला दंड म्हणून 25,000 रुपये द्यावे लागतील. यासंदर्भात एक आदेश दोन दिवसात जारी केला जाईल.’ सध्या पुणे शहरात साधारण 35 हजाराहून अधिक रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
अग्रवाल पुढे म्हणाले, 'आम्ही रुग्णांना होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र यातील अनेक लोक काही नियमांचे स्पष्टपणे उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहे. म्हणूनच आता घरी विलगीकरणामध्ये राहायचे असल्यास बाँडवर सही घेण्याच्या निर्णयाचा विचार करण्यात आला आहे.' मात्र या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. 25 हजाराच्या भीतीने रुग्णांनी होम क्वारंटाईनचा पर्याय स्वीकारला नाही, तर प्रशासन सर्वांना आरोग्य सुविधा पुरवण्यास समर्थ आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. (हेही वाचा: असेच वाढत राहिल्यास पुण्यात कोरोना रुग्णांना बेड्स कमी पडतील- पुणे महापौर मुरलीधर मोहोळ)
दरम्यान, पुण्यातील कोरोनाची स्थिती बिघडत चालली आहे. कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात असलेल्या राज्यातून व्हेंटिलेटर बेडचे हस्तांतरण करण्याचे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केले आहे.