Chandrakant Patil, Jayant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस संकटामुळे स्थगित झालेला निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोग हळूहळू पुन्हा पुर्वपदावर आणत आहेत. त्यामुळे पुणे विभागीय पदवीधर मतदार संघ निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्षांतून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातही पक्ष उमेदवारी सांगली, कोल्हापूर, पुणे यांपैकी कोणत्या जिल्ह्यात देतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूला सांगली, कोल्हापूर, पुणे यापैकी कोणत्याही जिल्ह्यात उमेदवारी दिली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा दोन पाटलांची प्रतिष्ठा मात्र चांगलीच पणाला लागणार आहे.

उमेदवारीसाठी पक्षात वरिष्ठांकडे फिल्डींग

निवडणूक आयोगाकडून पुणे विभागीय पदवीधर मतदार संघ निवडणूक केंव्हाही जाहीर होऊ शकते. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी आपापल्या पक्षात वरिष्ठांकडे फिल्डींग, लॉबींग लाऊन संपर्क व्यवस्थापण करण्यस सुरुवात केली आहे. उमेदवारी मिळावी यासाठी काही जण तर गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक चेहऱ्यांमधून एकाची निवड करणे हे वरिष्ठांसाठी एक आव्हानच आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला? पाहा कोणाच्या नावाची चर्चा?)

पदवीधर मतदारसंघ इच्छुक

पक्षाचे नाव उमेदवारीसाठी इच्छुकांची नावे
भाजप राजेश पांडे, शेखर चरेगावकर, माणिक पाटील चुयेकर, रोहन देशमुख, सचीन पटवर्धन, प्रसन्नजित फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेस अरूण लाड, नीता ढमाले, उमेश पाटील, बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे, प्रताप माने
इतर कोडोलीकर, मनोज गायकवाड, भरत रसाळे

भाजपची हॅट्रिक की राष्ट्रवादीच्या आमदारात भर?

गेल्या बऱ्याच काळापासून पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा वरचष्मा राहिला आहे. आगोदर प्रकाश जावडेकर आणि नंतर चंद्रकांत पाटील यांनी सलग पाच वेळा झेंडा फडकवत हा मतदारसंघ भाजपकडे ठेवला आहे. त्यामुळे आताही हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवत विजायची हॅट्रीक करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर अरुण लाढ किंवा अन्य उमेदवाराच्या रुपात जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार वाढवायचा आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: भाजपकडून 'पदवीधर मतदारसंघ निवडणूक' मोर्चेबांधणीस सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांची इच्छुकांशी चर्चा?)

दरम्यान, उमेदवारीसाठी इच्छुक असलेले सर्वच जण हे केवळ उमेदवारीस इच्छुक व्यक्ती नाहीत. ते आपापल्या पक्षातील विशिष्ठ अशा नेत्यांचेही समर्थक आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे उमेदवारी देत असताना पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण पाहूनही उमेदवार निवडावा लागणार आहे. एका बाजूला चंद्रकांत पाटील यांना आपला उत्तराधिकारी या मतदारसंघात निवडूण आणायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांना आणखी एक आमदार वाढवत पक्षीय राजकारण मजबूत करायचे आहे. त्यामुळे ही निवडणूक नेहमीप्रमाणे याही वेळी उत्सुकता वाढवणारी ठरली नाही तरच नवल.