Pune News: पुण्यात गणपती विसर्जन दरम्यान तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Pune News: पुण्यातील (Pune) हिंजवडी येथे एका २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश अभिमन्यू साखरे असं मृत तरुणाचे नाव होते. तो हनुमान तालीम मित्र मंडळात सहभागी होता. पुणे पोलिसांनी या तरुणाच्या मृत्यूची नोंद घेतली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हिंजवडीतील एका मिरवणूकीत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला अवस्थ वाटू लागलं होत. त्याने काही वेळा नंतर मेडिकल मधून औषध घेण्यासाठी धाव घेतला. मधेच रस्त्यावर अचानक योगेश कोसळला. हे पाहून स्थानिकांनी त्याच्याकडे धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. स्थानिक डॉक्टरांनी परिस्थिती पाहून त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता.

योगेशला स्थानिकांच्या मदतीने औंध रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीसांनी योगेशच्या मृत्यूची नोंद घेतली. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश विसर्जन मिरवणुकीपासून २० मीटर अंतरावर होता त्यामुळे उच्च डेसबल आवाजामुळे मृत्यू झाला नसावा असा अंदाज देखील पोलीसांनी वर्तवला आहे.