Pune Dam Water Storage: पुण्यातील खडकवासला धरणांत 97 टक्के पाणीसाठा, नागरिकांना दिलासा
Khadakwasala Dam (PC - Twitter)

पुण्याला पाणीपुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) समाधानकारक पाणी पुरवठा जमा झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाने जून महिन्यात दडी मारल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. यामुळे शहरातील काही ठिकाणी पाणीकपात (Water Cut) करण्यात आली होती. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी रात्रीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शनिवार सायंकाळी पाच वाजल्यापासून या धरणातून मुठा नदीत (Mutha River) 2 हजार 140 क्युसेक वेगाने सोडण्यात येत असलेले पाणी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. चारही धरणांत 28.39 अब्ज घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. (हेही वाचा - Ujani Dam Water: उजनीतील पाणीसाठ्यात वाढ, सोलापूरकरांना दिलासा)

खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांत मिळून एकूण 97.41 टक्के म्हणजे 28.39 अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला 99.83 टक्के म्हणजे 29.10 अब्ज घनपूट पाणी धरणसाखळी प्रकल्पात होते, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. . रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरण परिसरात 1 मिलीमीटर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 मिलीमीटर तर वरसगांव आणि टेमघर धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी २ मिलीमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.