Pune Crime News: पत्नीच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार, जेवण न दिल्याने हत्या; पतीकडून कृत्य
Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) तानाजी कांबळे (Tanaji Kamble) नामक एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. तो एका महिलेचा पती असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोप आहे की, त्याने त्याच्या पत्नीच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार करुन तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने जेवण दिले नाही या करणावरुन चिडलेल्या आरोपीने तिला बेदम मारहाण केली तसे तिच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार केला. ज्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज (Katraj Wife Murder) येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शिवगाळ आणि मारहाण

आरोपी तानाजी कांबळे हा पत्नी मधुरा कांबळे (वय-42) आणि मुलगा पियूष कांबळे (वय-19) यांच्यासोबत कात्रज येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत राहात होता. तो व्यवसायाने रंगारी होता आणि रोजंदारीने काम करत होता. घटना घडली त्या दिवशीही शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास आरोपी दारुच्या नशेत तर्रर्र होऊन घरी आला होता. त्याने घरी येताच पत्नीला जेवण देण्याचे फर्मान सोडले. पत्नीने त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तानाजी याने पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवगाळ आणि मारहाण करताना तानाजी इतका बेभाण झाला की त्याच्या मारहाणीत मधुरा जमीनीवर कोसळल्या. तरीही त्याची मारहाण सुरुच होती. यातच छातीवर मोठ्या प्रमाणावर बुक्क्यांचा प्रहार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय 19) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (हेही वाचा, Mumbai Crime: मुंबई चुनाभट्टी परिसरात गुंड पप्पू येरुणकरवर गोळीबार, एकाचा मृत्यू , 3 जण जखमी)

मुलाकडून पोलिसांमध्ये बापाविरुद्ध तक्रार

पियूष तानाजी कांबळे (वय 19) याने दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीसांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे.

अधिक माहिती अशी की, आरोपी तानाजी आणि मधुरा कांबळे यांच्यात प्रदीर्घ काळापासून कौटुंबीक वाद होते. त्यातून आरोपी हा त्याच्या पत्नीला सातत्याने मारहाण करत होता. नशेत तर्रर्र होऊन होणारी भांडणे तर नित्याचीच झाली होती. ही घटना घडली त्या दिवशीही आरोपीने दारुचे प्रचंड सेवन केले होते. तो प्रचंड नशेत होता. त्यातूनच त्याने पत्नीशी भांडण काढले. शब्दाने शब्द वाढत गेला. त्यातून रागाने बेभाण झालेला आरोपी पत्नीच्या अंगावर चाल करुन गेला. त्याने तिचा मृत्यू होईपर्यंत तिला मारहाण केली.