Abhijit Bichukale | (Photo Credits: Facebook)

भाजपाच्या मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा जागेवर आता पोट निवडणूक होणार आहे. 27 फेब्रुवारी दिवशी होणार्‍या या निवडणूकीसाठी आता उमेदवारांची आपले अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. भाजपाकडून हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस कडून रविंद्र धंगेकर यांचे ना पुढे आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात पोटनिवडणूका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आता कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीत अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची देखील एन्ट्री झाली आहे.

आमदार, खासदार ते अगदी राष्ट्रपतीच्या निवडणूकीसाठी आपलं नशिब आजमावणार्‍या अभिजित बिचुकले यांनी कसबा पेठ निवडणूकीमध्येही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी 'आपण कसबा पेठेत राहतो. येथील प्रश्न देखील माझे आहेत. जो पर्यंत मी विधानसभा / संसदेमध्ये जात नाही तो पर्यंत निवडणूक लढणार' असल्याचं बोलून दाखवलं आहे. यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजित बिचुकले उभे राहिले होते.

काही दिवसांपूर्वी कसबा पेठ मधून अभिजित बिचुकले यांनी पत्नी अलंकृता साठी उमेदवारी अर्ज घेतला असल्याची चर्चा होती पण आज स्वतः अभिजित बिचुकले यांनीच अर्ज दाखल केला आहे. दरम्यान राजकारणासोबतच बिग बॉस मराठी, हिंदी मध्येही बिचुकले यांनी एन्ट्री घेत धमाल उडवून दिली होती. नक्की वाचा: Pune By Poll Elections: कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूका होणार आणि महाविकास आघाडी जिंकणार; संजय राऊत यांनी 'बिनविरोध' निवडणूकांच्या आवाहनावर दिली 'ही' प्रतिक्रिया! 

भाजपा मध्ये हेमंत रासने यांनी कसबा पेठ मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी टिळक कुटुंबाला उमेदवारी नाकारल्यावरून नाराजी बोलून दाखवली होती. पण त्यांनीही भाजपाचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं आहे.