Swargate Bus Rape Case | (Photo Credit - X)

Swargate Bus Rape Case: दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिरुर तालुक्यातील एका गावातून शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. दत्तात्रय गाडे हा पुणे येथील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बलात्कार (Shivshahi Bus Rape Case) प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी आहे. त्याच्यावर 26 वर्षीय महिलेवर कथीत बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटना उघडकीस आल्यापासून तो फरार होता आणि पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी त्याचा माग काढला आणि मध्यरात्री त्याला ताब्यात घेतले. ही शोधमोहीम तब्बल 70 तास सुरु होती. आरोपीस पकडण्यासाठी 100 हून अधिक पुरुष आणि महिला पोलिसांची 13 पथके गावकऱ्यांच्या मदतीने ऊसाच्या शेतात शिरले होते. शिवाय ड्रोन आणि स्निफर डॉग तैनात केले होते. त्याला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

पुणे येथील स्वारगेट बसस्थानक परिसरात आगारात उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवेतील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना पुढे आली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर ही घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसर, पीडित तरुणी पुणे येथे नोकरी करते. या शहरापासून साधारण 100 किलोमीटर दूर असलेल्या फलटण येथे ती निघाली होती. त्यासाठी बस स्वारगेट बस स्थानक परिसरात ती तिची निश्चित बस शोधत होती. दरम्यान, संशयित आरोपी दत्तात्रय गाडे तेथे आला आणि त्याने तिची दिशाभूल करुन अंधारात आडबाजूला उभ्या असलेल्या बसमध्ये जाण्यासाठी तिस प्रवृत्त केले. तिथे त्याने तिच्यावर कथितरित्या बलात्कार केला. (हेही वाचा, Swargate Bus Rape Case Pune: कंडोम, चादरी आणि कपडे; सिगारेट पाकिटांचा खच; पुण्यातील स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणात धक्कादायक प्रकार)

आरोपीचे वर्तन आणि घटनाक्रम

  • दत्तात्रय गाडे याने बस कंडक्टर असल्याचे भासवून पीडितेशी संपर्क साधला.
  • त्याने तिची बस दुसरीकडे पार्क केलेली असल्याचे सांगून तिची दिशाभूल केली आणि तिला अचूक माहिती देण्याचा दावा केला.
  • त्यानंतर तो तिला आगाराच्या आत असलेल्या रिकाम्या शिवशाही बसकडे घेऊन गेला, तिच्या मागे
  • आत गेला, दरवाजे बंद केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. पण तत्पूर्वीत्याने तिच्यावर हल्ला केला.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी

या प्रकरणातील 37 वर्षीय गाडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्याविरुद्ध पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगचे सहा गुन्हे दाखल आहेत. अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तो 2019 पासून जामिनावर होता.

दरम्यान, या घटनेनंतर जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटली त्यानंतर महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सर्व एमएसआरटीसी बस डेपोचे राज्यव्यापी सुरक्षा ऑडिट करण्याची घोषणा केली. महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबवल्या जातील, असे आश्वासनही दिले. शिवाय, 15 एप्रिलपर्यंत सर्व नोंदणीकृत नसलेली आणि जप्त केलेली वाहने बस स्थानकांवरून काढून टाकावीत.

स्वारगेट डेपो अधिकाऱ्यांवर कारवाई

सुरक्षेत त्रुटींसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक आणि स्वारगेट बस डेपो व्यवस्थापक यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षा राखण्यात त्यांची भूमिका बारकाईने तपासली जाईल. बलात्काराच्या घटनेमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी-एससीपीचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा कार्यालय फोडले आहे.