भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोना वायरस (Coronavirus) थैमान घालत असताना या कठीण काळत वैद्यकीय क्षेत्रातील काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणात समोर आला. रूग्णांना हॉस्पिटल पर्यंत पोहचवण्यासाठी काही रूग्णवाहिका अव्वाच्यासव्वा पैसे आकारत असल्याचं समोर आले आहे. अनेकदा रूग्णांचे नातेवाईक देखील वेळेची गरज पाहता ते पैसे द्यायला तयार होतात पण हाच काळाबाजार रोखण्यासाठी आता पुणे आरटीओ (Pune RTO) पुढे आले आहे. त्यांनी पुण्यात रूग्णवाहिकांसाठी दर (Pune Ambulance Rate) निश्चित केले आहेत तर या दरांपेक्षा अधिक किंमती आकारल्यास कडक कारवाईचा देखील इशारा दिला आहे.
पुणे आरटीओच्या नव्या नियमावलीनुसार, सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी फ्लेक्सच्या स्वरूपात रुग्णालयाच्या आवारात रूग्णवाहिकांचे दर लावणं आवश्यक आहे. यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना त्याची माहिती मिळेल आणि या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास नागरिकांनी rto.12-mh@gov.in किंवा homebranchpune@gmail.com वर तक्रार करण्याचं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Jugaad Ambulance In Pune: पुण्यात रिक्षा चालक 'जुगाड अॅम्ब्युलंस' द्वारा कोविड19 च्या रूग्णांना देत आहेत आधार.
काय पुण्यात रूग्ण वाहिकांचे दर?
पुणे आरटीओच्या आदेशानुसार, रुग्णवाहिकांना पहिल्या दोन तासांसाठी किंवा 25 किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार, 600 ते 950 रुपये घेता येतील. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 12, 13 किंवा 14 रुपये आकारावेत, असा आदेश आरटीओकडून काढण्यात आला आहे.
रुग्णाला घेऊन जाण्याच्या आधी प्रतीक्षा करावी लागली तर, वेटिंग चार्ज म्हणून प्रत्येक तासाला 100, 125 आणि 150 रुपये असे दर ठरवण्यात आले आहेत.
पुण्यामध्ये देखील मुंबई सह राज्यातील इतर प्रमुख शहरांप्रमाणे कोरोनाचा विळखा घट्ट आहे. त्यामध्ये आता म्युकर माईकोसिसचा देखील धोका बळावल्याने रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना लुबाडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.