धुळवड साजरी करत असताना एका 8 वर्षीय मुलाच्या अंगावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथून समोर आली आहे. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. काल (10 मार्च) रोजी ही गंभीर घटना घडली असून रात्री यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी मुलगा आणि जखमी झालेला मुलगा हे दोघेही एकमेकांच्या घरासमोर राहतात. मंगळवारी सकाळी 8:30 च्या सुमारास दोघेजण धुळवड असल्याने रंग खेळत होते. त्याचदरम्यान अल्पवयीन मुलाने पांढऱ्या रंगाच्या बाटलीत असलेले अॅसिड 8 वर्षीय मुलाच्या अंगावर फेकले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. मुलाच्या आई-वडीलांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जखमी मुलाच्या वडीलांनी तक्रार दाखल केल्यांनंतर पोलिसांनी अॅसिड फेकण्याऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
यापूर्वीही धुळवडीनिमित्त रंग खेळताना अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे रंगाचा बेरंग करणाऱ्या घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून नियमावली जारी केली जाते. तसंच रंग खेळताना सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलिस वारंवार करत असतात.
धुळवडीला गालबोट लावणारी अजून एक घटना काल पुण्यात घडली. पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरातील खैरेवाडी येथे धुळवड साजरी करत असताना दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात वाहनांची तोडफोडही करण्यात आली. तसंच दगडफेकही झाली. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिस प्रकरणाची अधिक तपासणी करत आहेत.