प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Gujarati Garba/Facebook)

संपूर्ण देश कोरोना व्हायरसची (Coronavirus) लढा देत असताना सरकार प्रतिबंधात्मक उपयोजना राबविण्यास प्रयत्नशील आहे. या दरम्यान अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते, त्यानुसार सार्वजनिकरित्या सण व उत्सव साजरे करण्यास मनाई आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीमध्येही हीच स्थिती आहे. सरकारने गरबा व दांडिया (Dandiya) यांच्यावरही रोख लावली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दंडिया कार्यक्रम आयोजित केल्याच्या आरोपाखाली, पुणे जिल्ह्यातील आळंदी (Alandi) शहरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवरात्रात दांडिया आणि गरबा प्रतिबंधित केला आहे. आता हाच नियम मोडल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील एका गृहनिर्माण संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अशा गोष्टींवर बंधने असूनही त्यांनी मंगळवारी रात्री सोसायटीच्या आवारात 15 ते 20 पुरुष व स्त्रियांसह दांडिया मेळाव्याचे आयोजन केले होते. आयपीसी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या संबंधित कलमांतर्गत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारने यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आधीच जारी केली आहेत आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून नवरात्रोत्सवात कोणत्याही प्रकारचा गरबा व दांडिया कार्यक्रम आयोजित होणार नाही, याची स्पष्ट अधिसूचना देण्यात आली आहे. शारदीय नवरात्र 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे आणि 25 ऑक्टोबर रोजी त्याची सांगता होईल. महाराष्ट्रील मुंबई, पुण्या सारख्या शहरांमध्ये तर नवरात्र उत्सवाची धूम फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, घरात असलेल्या देवीची मूर्ती 2 फूटांपेक्षा जास्त उंच असू शकत नाहीत आणि मंडपांमधील मूर्त्या 4 फूटांपेक्षा कमी असाव्यात, असे सरकारने सांगितले आहे.