पुणे मधील 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरचा ससून रुग्णालयात मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकड्यासह बळींची संख्या सुद्धा वाढत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विखळ्यात अडकल्याने नागरिकांना लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यास आवाहन करण्यात येत आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. याच दरम्यान आता पुण्यातील एका 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरचा ससून रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या डॉक्टरांचे एक खासगी रुग्णालय असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पुण्यात सध्या कोरोनाचे 49993 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 2174 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून बळींचा आकडा 243 वर पोहचला आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच येत्या 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 44582 वर पोहचला आहे. तसेच 1517 जणांचा बळी गेला असून 30482 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असल्यास नागरिकांनी घरात थांबून नियमाचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. तर राज्य सरकारकडून स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.