'जवानांच्या बलीदानापुढे आम्हाला वाढदिवसाचे औचित्य नाही'; उदयनराजे भोसले साजरा करणार नाहीत वाढदिवस
Udayanraje Bhosale | (Photo credit: archived, edited, representative image)

Pulwama Terror Attack: साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आपला वाढदिवस (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी, कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे शुभेच्छा फलक सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कोठेही लावू नयेत. तसेच आम्हाला वाढदिवसानिमित्त हार-पुष्पगुच्छा आदी भेट देवू नयेत, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. आपल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी उदयनराजे यांनी एक पत्रकच प्रसिद्ध केले आहे. पुलवामा ( Pulwama ) येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यात शहीद झालेले जवान या पार्श्वभूमिवर उदयनराजे यांनी हा निर्णय घेतला आहे.

पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला आहे याची कल्पना न केलेली बरी, आज देश एका विशिष्ट वळणावर येवून ठेवला आहे. भारतीय जवान असे वीरमरण केवळ देशाच्या सीमा अभेद्य ठेवण्यासाठी स्विकारत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाने जवानांच्या पाठीशी उबे राहिले पाहिजे. वाढदिवसाचे औचित्य आम्हाला फार आहे असे नाही. वाढदिवस येतील आणि जातील, तथापि आजच्या घडीला जवानांच्या दुख:त सहभागी होता यावे या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कोणीही कार्यकर्त्याने शुभेच्छा फलक कोठेही लावू नयेत किंवा पुष्पगुच्छ, हार तुरे भेट देऊ नये. अशा शुभेच्छा स्विकारल्या जाणार नाहीत, असेही छत्रपती उदयनराजे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. (हेही वाचा, अन 'हे' गाणं ऐकून खासदार उदयनराजे झाले भावूक! सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल (Video))

Udayanraje Bhosale letter about his birthday (छायाचित्र सौजन्य: व्हॉट्सअप/ सोशल मीडिया)

सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यानंतर बॉलिवुडसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. उदयनराजे भोसले यांनीही या हल्ल्याचा निषेध करत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.