Sharad Pawar (Photo Credits: Getty)

गेले अनेक महिने राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलन सुरु आहे. अशात आज, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकबाहेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) च्या 100 हून अधिक कामगारांनी संतप्त निदर्शने केली. शरद पवार यांनी एसटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात मदत केली नाही, असे कामगारांचे म्हणणे होते. यावेळी शरद पवार यांच्या घरावर चप्पलफेकही करण्यात आली.

त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट दिली. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आजच्या आंदोलनाबाबत योग्य ती चौकशी केली जाईल. दुपारी 3 च्या सुमारास दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानाबाहेर आंदोलक जमले होते. यावेळी पवार यांच्या कन्या आणि लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना घराबाहेर शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक शांत झाले नाहीत.

पोलिसांनी नंतर अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन तेथून नेले. आता घराबाहेर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कामगारांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन मंत्री परब यांनी हायकोर्टाने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये कामावर रुजू होणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते.

राज्य परिवहन मंडळाचे 90,000 पेक्षा जास्त कर्मचारी नोव्हेंबर 2021 पासून संपावर आहेत. संप सुरू झाल्यापासून एमएसआरटीसीच्या सुमारे 120 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या नसून राज्याच्या धोरणामुळे झालेल्या हत्या आहेत. शरद पवार यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काहीही केले नाही, असे एका आंदोलकाने पत्रकारांना सांगितले. (हेही वाचा:  शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या घटनेचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध)

अजून एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयाचा आदर करतो, पण जनतेने निवडून दिलेल्या राज्य सरकारने आमच्यासाठी काहीही केले नाही. या सरकारचे चाणक्य शरद पवार आमच्या झालेल्या नुकसानीसाठी जबाबदार आहेत.