Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रोपीलीन गॅस टँकर उलटला; तिघांचा मृत्यू
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Mumbai Pune Expressway Accident: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील (Raigad District) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) विरुद्ध लेनला जाताना प्रोपीलीन गॅस वाहून नेणाऱ्या एका वेगवान टँकरने कारला धडक दिली. या अपघातात सोमवारी तीन जण ठार झाले आणि किमान दोन जण जखमी झाले. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.

रायगड जिल्हा पोलिसांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या खोपोली एक्झिटजवळ रात्री 12 वाजण्याच्या सुमारास टँकर पुण्याहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. (हेही वाचा - Nagpur: नागपूर शहरातील बेलतरोडी महाकाली नगर झोपडपट्टीत भीषण आग)

रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मुंबईच्या दिशेने निघालेला टँकर वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो उलट्या लेनला गेला. टँकरने किमान तीन गाड्यांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, एका कारमध्ये प्रवास करणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणांनी मदतकार्य सुरू केले आहे.”

या अपघातात टँकर चालकासह किमान दोन जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक पोलिसांसह स्थानिक अग्निशमन दल, एक्सप्रेसवे आपत्कालीन प्रतिसाद दल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, मिळाल्यालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणत्याही गॅस गळतीची नोंद झाली नाही. वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने वाहने काढण्यात आल्याचे झेंडे यांनी सांगितलं.