'पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक यांनी गांधी कुटुंबीयांची माफी मागा अन्यथा...', काँग्रेस नेते सुनील केदार यांचा इशारा
Mukul Wasnik, Milind Deora, Prithviraj Chavan,Sunil Kedar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), मिलिंद देवरा (Milind Deora) आणि मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि संपूर्ण गांधी कुटुंबीयांची (Gandhi Family) माफी मागावी. अन्यथा राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा थेट इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री, काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिला आहे. केदार यांनी ट्विटरद्वारे आपल्याच पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे. तसेच, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतही आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत असे सांगत या नेत्यांनी माफी मागावी असा पुनरुच्चार केला आहे.

काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा आणि गांधी कुटुंबातील व्यक्तीला पक्षाध्यक्ष पद घ्यायचे नसेल तर अन्य व्यक्तीची या पदावर निवड करावी, अशा आशयाचे एक पत्र काही नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाला पाठवले आहे. या पत्रावरुन आक्रमक होत, सुनील केदार यांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे. सुनील केदार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी सोनिया गांधी यांचे मनापासून समर्थन करतो. सोनिया गांधी अथवा गांधी कुटुंबातील व्यक्तीच्या नेतृत्वाबद्दल पक्षातीलच नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे लज्जास्पद आहे. राज्यातील ज्या नेत्यांनी हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी संपूर्ण गांधी कुटुंबीयांची माफी मागावी असे केदार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि मुकुल वासनिक यांचा थेट नामोल्लेख करत केदार यांनी या तिघांनी माफी मागावी असे म्हटले आहे.

काँग्रेस कार्यकारिणी समितीची एक बैठक उद्या पार पडत आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत चर्चा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते कार्यकर्त्यांच्या पत्राला सोनिया गांधी यांनीही प्रत्युत्तर दिले असून, सर्वांनी एकत्र यावे आणि सक्रीय आणि कार्यक्षम नेत्याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करा असा सल्लाही दिला आहे. (हेही वाचा, Congress Party President: सोनिया गांधी पद सोडण्याची शक्यता, काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे? 'त्या' पत्रामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा)

दरम्यान, सुनील केदार यांनी ज्या नेत्यांनी सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबातील व्यक्तीच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. काँग्रेस वगळून आपण किती निवडणुका लढवल्या. काँग्रेस पक्ष वगळला तर हे नेते किती निवडणुकांमध्ये निवडूण येऊ शकतात हे त्यांनी स्वत:ला विचारावे, असे म्हटले आहे. जो तळागाळातला कार्यकर्ता आहे तो गांधी कुटुंबातील व्यक्तिच्या नेतृत्वावर उपस्थित केलेली शंका कधीच खपवून घेणार नाही, असेही सुनील केदार यांनी म्हटले आहे.