देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे (Coronavirus Second Wave) थैमान पाहायला मिळत आहे. दिवसागणित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर इंजेक्शन्स यांसोबत इतर आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आज तीन महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, देशात महाराष्ट्र (Maharashtra), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अजून एक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, अशी माहिती पीएमओ कार्यालयातून देण्यात आली आहे. त्याबरोबर देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने पंतप्रधान मोदी देशभरातील प्रमुख ऑक्सिजन निर्मात्यांसोबतही बैठक घेणार आहेत. दरम्यान, या बैठकांमधून काही उपाययोजना हाती लागतील अशी आशा आहे.
ANI Tweet:
Delhi: Prime Minister Narendra Modi chairs a meeting with the Chief Ministers of high burden states, over the prevailing #COVID19 situation pic.twitter.com/u91CKrGOLJ
— ANI (@ANI) April 23, 2021
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांची संवाद साधला होता. त्यावेळी कोविडची दुसरी लाट भयंकर असून खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केलं होतं.
काल आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण 3,14,835 नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ झाली असून 2,104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 22,91,428 सक्रीय रुग्ण आहेत. एकूण 13,23,30,644 रुग्णांना लस देण्यात आली आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,59,30,965 वर पोहचला आहे. तर 1,84,657 मृतांची नोंद झाली आहे. तब्बल 1,34,54,880 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.