Lokmanya Tilak Award Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकचालुकानुवर्तीत्वाला विरोध करण्याच्या उद्देशनेच विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर INDIA आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडी स्थापन केली आहे. असे असताना त्यांच्याच स्वागतासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. जे स्वत: विरोधकांच्या आघाडीतील एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे पवार यांच्या भूमिकेवरुन विरोधकांमध्ये जोरदार नाराजी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्षानेही या आधी ही नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. शिवसेना (UBT) मुखपत्र असलेल्या सामना संपादकीयातूनही ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जर भेट झाली तर ती महाविकासआघाडी आणि विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीला धक्का देणारी असू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवरुन दस्तुरखुद्द महाविकासआघाडीतूनच दबक्या आवाजात तीव्र विरोध पाहायला मिळतो आहे. पुढच्या अवघ्या काहीच मिनीटांमध्ये कार्यक्रम सुरु होणार आहे.
शरद पवार हे कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत. व्यासपिठावर राज्यपाल रमेश बैस, शरद पवार आणि टीळक स्मारक संस्थेचे दीपक टीळक उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या अवघ्या काहीच मिनीटांमध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. दरम्यान, मोदींना पुरस्कार देणाऱ्या संस्थेशी संबंधीत असल्याने काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव कार्यक्रम पत्रिकेवर आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थितराहणार का याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. खास करुन पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, अलका चौक, टिळक रस्ता, जेधे चौक, संगमवाडी रोड , विमानतळ रोड दुपारी 3 पर्यंत बंद आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे अवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. (हेही वाचा, Traffic Route Change in Pune today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज वाहतूक मार्गात बदल, घ्या जाणून)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तब्बल 300 फलक लावले आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आक्रमक झाली आहे. मणीपूर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षर बोलत नसल्याने काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान येणार म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन अतिशय सतर्क झाले आहे. प्रशासनाने शहरात तब्बल 7 हजार पोलीस तैनात केले आहेत.