Pravin Darekar Meet to Pathardi Farmer Family (PC - Twitter)

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील शेतकऱ्याच्या (Pathardi Farmer Suicide) तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजप उचलणार असल्याचं आश्वासन विरोध पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिलं आहे. आज प्रवीण दरेकर तसेच शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या भाजप आमदार मोनीका राजळे (Monika Rajale) यांनी अहमदनगरमध्ये पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली.

प्रवीण दरेकर यांनी यावेळी पीडित कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजप स्वीकारणार असल्याचं जाहीर केलं. तसेच पीडित कुटुंबाला भाजपतर्फे 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली. यावेळी दरेकर म्हणाले की, 'शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली असती, तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळेच मल्हार बटुळे यांनी आत्महत्त्या केली. फसव्या कर्जमाफीवरून दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच ठाकरे सरकार असंवेदनशील असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. (हेही वाचा - 'बळीराजा नको करु आत्महत्या' तिसरी शिकणाऱ्या मुलाने शेतकरी आत्महत्येवर सादर केली कविता अन् त्याच रात्री वडीलांनी विष प्राशन करून संपवली जीवन यात्रा)

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात यासाठी मल्हारी बटुळे यांच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलाने 'बळीराजा नको करु आत्महत्या' अशा आशयाची कविता शाळेत सादर केली होती. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच दिवशी रात्री या मुलाच्या शेतकरी वडिलांनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवल. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

नेमकी काय आहे प्रकरण -

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील भारजवाडी येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका मुलाने 'बळीराजा नको करु आत्महत्या', अशा आशयाची एक कविता आपल्या शाळेत सादर केली. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच रात्री या मुलाच्या शेतकरी वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रशांत बटुळे असं या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रशांत पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमाननगर येथे तिसरीच्या वर्गात शिकतो. प्रशांतने बुधवारी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी आपल्या शाळेत 'अरे बळीराजा नको करु आत्महत्या' ही कविता सादर केली होती. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये, यासाठी त्याने ही कविता रचली होती. परंतु, त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली.