
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात राज्याच्या राजकीय वर्तुळाला (Politics of Maharashtra) नवा विषय दिला. त्यांच्या विधानामुळे जोरदार चर्चा सुरु झाल्याच. मात्र, कोणाला कोठे जायचे आहे हा प्रश्नही निर्माण झाला. अर्थात कोणालाच कोठे जायचे नाही. तरीही एकमेकांना टोलेबाजी करत राजकीय नेत्यांनी या प्रश्नाला जोरात हवा दिली आहे. याची सुरुवात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यापासून झाली. मग त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. त्यानंतर औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारे भाष्य केले. तर या भाष्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे नाव घेऊन टोला लगावला. पाहा कोण काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पुणे येथील एका कार्यक्रमात सूत्रसंचालकाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला. त्यावर माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांनी पाहा, असे म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी केढलेले उद्गार आणि लगेचच मुख्यमंत्र्यांनी केलेले आजचे विधान याचा संबंध लावत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Statement: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपला ऑफर की NCP, काँग्रेला इशारा? 'त्या' विधानावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क)
संजय राऊत काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. मी असं ऐकलं आहे की, चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर मी त्यांना सांगितले की, तुम्ही पुढची 25 ते 30 वर्षे माजीच राहणार आहात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मराठवाडा मुक्तीसंग्राम ( Marathwada Mukti Sangram) दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमावेळी बोलताना भाषणाची सुरुवात करतानाच 'व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी आणि सोबत आले तर भविष्यातील सहकारी' असे वाक्य मुख्यमंत्र्यांनी वापरले. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरुन टाकलेला कटाक्ष राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवताना दिसतो आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विधानावरुन छगन भुजबळ यांनी रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा धाका पकडत छगन भुजबळ म्हणाले “चांगली गोष्ट आहे.राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर?”
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दबावाचे राजकारण करताना दिसत असल्याचा सूरही त्यांच्या विधानानंतर उमटत आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवरुन तिन्ही पक्षांच्या आमदार, मंत्र्यांमध्ये अनेकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खडाखडी सुरु आहे. असा वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांना इशारा देण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असावे असा अर्थ काढला जात आहे. मला भाजपसोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, असेच एक प्रकारे मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादीला सूचवत असल्याचे काही राजकीय अभ्यासकांचे म्हणने आहे.