'मातोश्री'वर राजीनामा देण्यासाठी व आंदोलन करण्यासाठी निघालेल्या रवी गायकवाड समर्थकांना पोलिसांनी अडवले; तिकीट नाकारल्याने नाराजी
खा. रवींद्र गायकवाड (Photo Credit : Youtube)

लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections)च्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. काही ठिकाणी हासू तर काही ठिकाणी नाराजी असे दृश्य दिसत आहे. शिवसेनेने खासदार रवी गायकवाड (Ravindra Gaikwad) यांना तिकीट न दिल्याने त्यांचे समर्थक प्रचंड चिडले आहेत. शनिवारी रात्री राजीनामा देण्यासाठी आणि आंदोलनासाठी ते 'मातोश्री'कडे कूच करत होते. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी मध्यरात्री 1 च्या सुमारास त्यांना तुळजापूर येथे अडवले. मात्र, तरीही गायकवाड समर्थकांनी इतर वाहनांतून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. आज हे समर्थक उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यामुळे मातोश्रीवर काय चर्चा घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने उस्मानाबादचे खासदार प्रा. रविंद गायकवाड यांचे तिकीट कापत त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. यावरून चिडलेल्या गायकवाड समर्थकांनी काल रात्री उमरगा येथे मेळावा घेतला. त्यात पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी राजीनामा देण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वजण मुंबईच्या दिशेने कूच करत होते. बसमध्ये घोषणाबाजीही चालली होती. पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी तुळजापूर येथे हा ताफा रोखला. मात्र तरीही रातोरात इतर वाहनांची व्यवस्था करून अनेकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. परंतु मातोश्रीवर कडक बंदोबस्त असल्यामुळे कोणालाही आत सोडण्यात आले नाही. (हेही वाचा: राज्यात महाआघाडीची घोषणा; इतक्या जागांसाठी लढणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी)

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात चपलेने मारहाण केल्याने गायकवाड वादात सापडले होते. त्यामुळे त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान कोल्हापूर इथून आज भाजप-शिवसेना युतीचा नारळ फुटणार आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील तपोवन मैदानात संध्याकाळी 6 वाजता मोठ्या सभेचे आयोजन केले गेले आहे.